गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकी व्हिसाबद्दल थेट व्हाइट हाऊसपर्यंत लॉबिंग करणारे उद्योगपती , व अमेरिकास्थित भारतीयांच्या संघटनांचे अध्यक्ष सीके ऊर्फ चंदू पटेल यांचे हिम्मतनगर मतदारसंघाचे तिकिट कापण्यात आल्याने त्यांच्या अमेरिकी मित्रवर्गामध्ये नाराजी पसरली आहे . दस्तुरखुद्द सीके पटेल नाराज झाल्याचा परिणाम निवडणुकीत येणा - या निधीवर होऊ शकतो , असे गुजरातमधील जाणकारांचे मत आहे .
सीके पटेल यांची उद्योगविश्वातील यशोगाथा गुजराथी जनतेला भावेल , अशीच . एनआरआय समुदायातील धनाढ्य सीके पटेल यांच्याकडे सुमारे ३४ दशलक्ष डॉलरची व्यापारी मालमत्ता असल्याचे सांगितले गेले . अमेरिकेत त्यांचे हिल्टन हॉटेल रिसॉर्ट आहे . कॅलिफोर्नियामध्ये गुजराथी बांधवांसाठी अनेक कम्युनिटी हॉल त्यांचेच आहेत . गुजराथच्या हिंमतनगर परिसरातही त्यांची संपत्ती आहे . अर्थात व्यापारप्रेमी गुजराथींमध्ये ओढ असली , तरी यापूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर त्यांचे नशीब फळफळले नव्हते व त्यांना हिंमतनगरमधूनच साडेआठ हजारांच्या मतांनी पराभव पत्करावा लागला होता . त्यावेळी २ अब्ज रुपयांची मालमत्ता असणारा सर्वात धनाढ्य उमेदवार काँग्रेसकडे होता . त्यानंतर मात्र नरेंद्र मोदी यांनी नॅनो प्रकल्प गुजराथकडे आणल्याने ते भारावून गेले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला . लोकसभा निवडणुकीत साबरकांटा मतदारसंघातून त्यांना निवडणूक लढविण्याची इच्छा होती . मात्र तेव्हाही निराशाच आली आणि आता हिंमतनगरमधून निवडणूक लढवायची इच्छा असतानाही तेच झाले आहे . त्याऐवजी भाजपचे विद्यमान मंत्री प्रफुल पटेल यांना नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी दिली आहे . मोदींनी त्यांचे तिकिट का कापले , याचे खरे कारण मात्र गुलदस्त्यात आहे .
सीके पटेल हे सध्या नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन अमेरिकन असोसिएशन या गुजराथी एनआरआय शिखरसंघटनेचे अध्यक्ष आहेत . याच संघटनेने अंतराळवीर सुनीता विल्यम्स हिची गुजराथभेट पुरस्कृत केली होती . पटेल यांना तिकिट नाकारल्याने एनएफआयएएचे सदस्य कमालीचे नाराज आहेत . व्हिसाप्रकरणात मोदींना पाठिंबा देण्यासाठी सीके पटेल व एनएफआयए यांनी संयुक्तपणे व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषदही घेतली होती . त्यांना तिकिट नाकारल्याचा आम्हा सर्वांना धक्का बसला असून हा एनआरआय समुदायाचा अवमान आहे
No comments:
Post a Comment